‘जागृती’च्या विद्यार्थ्यांचा ‘अमृत संवाद सेतू’तून तहसीलदारांशी थेट संवाद


अमृत संवाद सेतू उपक्रम; ‘जागृती’च्या ५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग 

गडहिंग्लज प्रतिनिधी :(संपत सावंत )

उद्याचे सुजाण नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शासन आणि प्रशासनाविषयी विश्वास, जागरूकता आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने गडहिंग्लज तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमात जागृती प्रशालेच्या ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजून घेतली.

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) जिल्हा कार्यालय, कोल्हापूर आणि गडहिंग्लज तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत महसूल प्रशासनाची रचना, तहसील कार्यालयाचे कामकाज, विविध शासकीय विभागांची जबाबदारी, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, विद्यार्थ्यांना दिले जाणारे दाखले यांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी अत्यंत सोप्या भाषेत उत्तरे देत त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले. प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शासकीय यंत्रणेप्रती विश्वास आणि उत्सुकता निर्माण झाली.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणे ही अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानवर्धक बाब असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी सांगितले. या उपक्रमात नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, अमृत जिल्हा व्यवस्थापक अभिजीत कुलकर्णी, अमृत मित्र शिरीष कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक उमेश सावंत, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांचे प्रोत्साहन मिळाले.उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडाशिक्षक संपत सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.


2
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!