खानापूर THO पदभार डॉ.संजीव नांद्रे यांच्याकडे
लोकायुक्त कारवाईनंतर आरोग्य विभागात हालचाली; बेकायदा क्लिनिक, रुग्णालये व बोगस डॉक्टरांवर कारवाईचे संकेत
खानापूर : खानापूर तालुका आरोग्याधिकारी (THO) डॉ. महेश किवडसण्णावर यांच्यावर लोकायुक्तांनी केलेल्या कारवाईनंतर रिक्त झालेल्या तालुका आरोग्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार बेळगाव सिटी कॉर्पोरेशनचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात २२ तारखेला पोल्ट्री फार्मसाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी शेतकऱ्याकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. महेश किवडसण्णावर हे लोकायुक्तांच्या कारवाईत अडकले होते. या घटनेनंतर खानापूर तालुका आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजात बदल करण्यात आला असून, आता बेळगाव तालुका THO डॉ. संजीव नांद्रे यांनी पुन्हा तालुका आरोग्याधिकारीपदाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली आहे.
कोरोना काळात प्रभावी आरोग्य व्यवस्थापन
डॉ. नांद्रे यांनी यापूर्वी २०१९ ते २०२४ या कालावधीत खानापूर तालुका आरोग्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे नियोजन, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि रुग्णसेवेच्या समन्वयावर भर दिला होता.
त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळात तालुक्यातील अनधिकृत वैद्यकीय आस्थापना, नियमबाह्य क्लिनिक व रुग्णालये तसेच आवश्यक पात्रता व परवान्यांशिवाय वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींविरोधात आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. काही प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन कारवाईदेखील करण्यात आली होती.
बेकायदा क्लिनिक , डॉक्टर वर कारवाईचे संकेत
डॉ. नांद्रे यांनी पुन्हा पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील आरोग्य सेवेशी संबंधित अनधिकृत क्लिनिक, नियमांचे उल्लंघन करणारे दवाखाने तसेच बोगस डॉक्टरांविरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. आरोग्य सेवा अधिक पारदर्शक, सक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पैशांची मागणी झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन
शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये उपचार किंवा इतर आरोग्य सेवा घेताना डॉक्टर अथवा कर्मचाऱ्याकडून विनाकारण त्रास दिला जात असल्यास किंवा पैशांची मागणी होत असल्यास नागरिकांनी थेट आरोग्य विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन डॉ. नांद्रे यांनी केले आहे.
त्यामुळे डॉ. नांद्रे यांच्या पुनरागमनामुळे खानापूर तालुक्यातील आरोग्य सेवा, वैद्यकीय आस्थापनांची तपासणी आणि अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाविरोधातील कारवाईला पुन्हा वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Advertise


