
बुद्धिमत्तेची चमक! दुर्गम अबनाळीतील ९ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
खानापूर: राजू कुंभार
भीमगड अभयारण्याच्या घनदाट जंगलात आणि अतिशय दुर्गम भागात वसलेल्या अबनाळी गावातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली आहे. नुकत्याच खानापूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अबनाळीच्या तब्बल ९ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.
प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही गटांतून या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत विजय मिळवत हे घवघवीत यश संपादन केले. जिल्हास्तरीय स्पर्धा लवकरच बैलहोंगल येथे पार पडणार आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले विजेते खेळाडू:
* अबनाळी प्राथमिक शाळा: वेदांत रमेश गावकर, राधिका मष्णू लाड, अश्विनी पंडित डीगेकर.
* सरकारी माध्यमिक विद्यालय, शिरोली: परशराम नामदेव गावकर, सानिका संदीप कोवाडकर, सानिका संतोष गावकर.
* मराठा मंडळ हायस्कूल, खानापूर: सतीश श्रीकांत सावंत, वर्षा विलास मेंडीलकर.
* सिद्धिविनायक हायस्कूल, खानापूर: कृष्णा राघोबा मेंडीलकर.
१० वर्षांची सातत्यपूर्ण परंपरा
अतिशय प्रतिकूल आणि दुर्गम परिस्थिती असूनही अबनाळी गावातील विद्यार्थ्यांची बुद्धिबळातील प्रतिभा वाखाणण्याजोगी आहे. गेल्या १० वर्षांपासून येथील विद्यार्थी सातत्याने जिल्हा तसेच राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. या यशाचे मुख्य श्रेय अबनाळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमेश कवळेकर यांना दिले जात आहे. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व मेहनतीमुळेच आज अबनाळीचे नाव राज्यस्तरावर गाजत आहे.
गुणी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव
विद्यार्थ्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल खानापूर तालुक्याचे बीईओ मंजुनाथ हत्ती, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन चवलगी, प्रधान कार्यदर्शी बाळासाहेब चापगावकर, शिरोली केंद्राचे सीआरपी बी. ए. देसाई, शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष गंगाराम गावकर आणि उपाध्यक्षा निता निवृत्ती गावकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Advertise


