बरगाव शाळेच्या मुद्द्यावर आमदार-खासदार ‘टोलवाटोलवी


निधीसाठी हात आखडता, जबाबदारी झटकण्यात आघाडी!

बरगाव शाळेच्या मुद्द्यावर आमदार-खासदार ‘टोलवाटोलवी

 “हे काम आमदारांचे आहे” म्हणत खासदारांकडून हात झटकले?; “ग्रामपंचायतीकडे येते” म्हणत आमदारांकडूनही जबाबदारी ढकलल्याचा महांतेश पाटील यांचा आरोप

खानापूर : प्रतिनिधी

बरगाव (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीची कौले पडून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर शाळेच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतरही शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा निधी कोण देणार? या प्रश्नावर लोकप्रतिनिधींकडून जबाबदारी एकमेकांकडे ढकलली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे युवा नेते तथा बरगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य महांतेश पाटील यांनी केला आहे.

बरगाव दौऱ्यावर आलेले आमदार विठ्ठल हलगेकर आणि खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी केली. मात्र, आपण केलेल्या विनंतीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाटील यांनी शिवस्मारकात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

पाटील यांच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या इमारतीच्या कामाबाबत खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे मागणी केली असता, “हे काम आमदारांचे आहे,” असे उत्तर देण्यात आले. तर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे हा विषय मांडल्यानंतर “हे काम ग्रामपंचायतीकडे येते,” असे सांगण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला.

“विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कौले पडतात, तरी जबाबदारी कोणाची?”

शाळेच्या इमारतीची अवस्था धोकादायक बनली असताना निधी आणि जबाबदारीच्या मुद्द्यावर अशी टोलवाटोलवी होत असेल, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

“ही आपली मराठी शाळा आहे. ती टिकली पाहिजे, या तळमळीने मी आमदार आणि खासदारांना शाळेची पाहणी करण्याची विनंती केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी आहे,” असे पाटील यांनी सांगितले.

“२३ वर्षे पक्षासाठी काम केले; तरी जेष्ठ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष!”

महांतेश पाटील यांनी आपण गेल्या २३ वर्षांपासून भाजपचा तळमळीचा कार्यकर्ता असल्याचे सांगत पक्षासाठी सातत्याने काम केल्याचा दावा केला. ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनेक वर्षे काम करताना आपण कोणाकडूनही पैशांची मागणी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“माझ्यावर कोणी पैशांची मागणी केल्याचा आरोप सिद्ध केला तर मी निवडणूक लढवणार नाही,” असे आव्हानही त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.

दरम्यान, पक्षाच्या आमदार-खासदारांकडून भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. “आमदार-खासदार हे पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून कामाची अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही,” असे ते म्हणाले.

बरगावच्या शाळेच्या छतावरील कौले विद्यार्थ्यांच्या अंगावर पडून जखमी होण्याची घटना घडल्यानंतरही शाळेची जबाबदारी कोणाची आणि दुरुस्तीचा निधी कोण देणार, यावरच जर वाद सुरू असेल, तर पालक आणि ग्रामस्थांनी प्रश्न कुणाला विचारायचा? असा मुद्दा आता चर्चेत आला आहे.

Advertise

 


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!