गोकुळ निवडणूक: पहिल्याच दिवशी ४७० अर्जांची विक्री; रणधुमाळीला सुरुवात!


​माजी चेअरमन नावेद मुश्रीफ यांच्यासह ३ माजी संचालकांचे अर्ज दाखल; इतर आघाड्यांची गुरुवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरण्याची शक्यता.

कोल्हापूर प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ च्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली आहे. मंगळवारी (दि. १५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी इच्छुकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. पहिल्याच दिवशी तब्बल ४७० उमेदवारी अर्जांची विक्रमी विक्री झाली असून, यावरून आगामी निवडणुकीत मोठी ईर्ष्या आणि चुरस पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

​पहिल्या दिवशी तीन माजी संचालकांचे अर्ज

​अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी मावळते चेअरमन नावेद मुश्रीफ, मावळते संचालक शंतनू/शशिकांत पाटील-चुयेकर आणि वसंत उर्फ बाळासाहेब खाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, पहिल्या दिवशी अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय (OBC) आणि महिला राखीव गटातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

​महायुती आणि शाहू आघाडीचे गुरुवारी अर्ज दाखल होणार

​महायुतीची रणनीती: महायुतीतील भाजप वगळता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाच्या इच्छुकांमार्फत येत्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडण्याची शक्यता आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास भाजपचे इच्छुकही गुरुवारीच अर्ज भरतील, अन्यथा भाजप २१ सप्टेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​शाहू आघाडीची तयारी: दुसरीकडे, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडी’च्या वतीने देखील गुरुवारी (दि. १७) मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी दोन्ही आघाड्यांकडून मोठे शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!