भक्तीचा गजर आणि ढोल-ताशांचा नाद; चंदगड तालुक्यात श्री गणरायांचे भक्तिमय वातावरणात आगमन


पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरगुती व सार्वजनिक बाप्पा विराजमान; डॉल्बीऐवजी परंपरेला पसंती.

चंदगड प्रतिनिधी – श्री स्वप्निल कुंभार.

चंदगड तालुक्यात  गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून घरगुती तसेच सार्वजनिक गणरायाचे अत्यंत भक्तिभावाने आणि थाटामाटात आगमन झाले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच बाप्पाच्या स्वागतात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

​सकाळपासूनच लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळाली. आकर्षक आरास, फुलांची सजावट आणि झगमगत्या रोषणाईने प्रत्येक घर सजले आहे. यंदा घरगुती गणपती बाप्पांचा मुक्काम १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर असा सहा दिवसांचा असल्याने तालुक्यात पुढील काही दिवस महाआरती, मोदकांचा प्रसाद आणि विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सर्वत्र सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

​पारंपरिक वाद्यांचा गजर व प्रशासकीय आवाहनाला प्रतिसाद.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने देखील मिरवणुका काढून गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना मंडपात करण्यात आली. पोलीस प्रशासनाने डॉल्बी व कर्णकर्कश ध्वनिवर्धकांवर बंदी घालत केलेल्या आवाहनाला नागरिकांनी आणि मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी डॉल्बीला फाटा देत पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले. गणरायाच्या या आगमनाने संपूर्ण चंदगड तालुका भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!