संपूर्ण महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावत ग्रामीण भागातील तरुणाची नेत्रदीपक कामगिरी..
चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर बोंजुर्डी (तालुका चंदगड) येथील होनहार तरुण कृष्णा प्रकाश पाटील याने यशोशिखर गाठले आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या निवड प्रक्रियेअंतर्गत झालेल्या परीक्षेत कृष्णाने संपूर्ण महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवून आपल्या कौशल्याची आणि गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. या दैदिप्यमान यशामुळे त्याची ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’मध्ये थेट निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अथांग क्षमता आणि गुणवत्ता ठासून भरलेली असते; गरज असते ती फक्त योग्य दिशा, कष्ट आणि आत्मविश्वासाची, हेच कृष्णाने आपल्या यशोगाथेतून सिद्ध करून दाखवले आहे. मर्यादित संसाधनांचा अडसर न मानता ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न केल्यास देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये स्थान मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश त्याच्या या यशातून मिळतो.
कृष्णाच्या या गगनभरारीची बातमी समजताच बोंजुर्डी गावासह संपूर्ण चंदगड तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्याच्या या अलौकिक यशाबद्दल ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्याच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


