मोटार दुरुस्त करताना विजेचा धक्का; दाबेलीतील ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


आजरा तालुक्यातील दाबेली येथील घटना; परिसरात हळहळ.

उपसंपादक :श्री. स्वप्निल कुंभार.  (चंदगड, आजरा गडहिंग्लज)

येथील जुटिंग माळ परिसरातील शेतात भातशेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या मोटारीची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का लागून श्रावण गणपती वाझे (वय ५९) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (११ ऑगस्ट) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

वाझे हे इलेक्ट्रिक साहित्य दुरुस्तीचे काम करत होते. भातशेतीला पाणी देण्यासाठी शेतातील मोटार सुरू करण्यापूर्वी तिच्या दुरुस्तीचे काम ते करत होते. याचदरम्यान अचानक विद्युतप्रवाहाचा धक्का बसल्याने ते गंभीररीत्या बाधित झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेची नोंद आजरा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शेतांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी विद्युत मोटारी, पंप व इतर उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे अशा उपकरणांची दुरुस्ती किंवा हाताळणी करताना विद्युतपुरवठा पूर्णपणे बंद आहे की नाही, याची खात्री करणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

इलेक्ट्रिक साहित्याच्या दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या वाझे यांच्या अकस्मात निधनाची बातमी समजताच दाबेली परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

 


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!