सरनोबतवाडीत धक्कादायक प्रकार; अनैतिक संबंधांच्या संशयातून वाद, आरोपी अटकेत

मयत – रुक्मिणी सहानी.
कोल्हापूर : शहरातील सरनोबतवाडी परिसरात मोठ्या भावाच्या पत्नीची तिच्या दीराने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुक्मिणी धर्मेंद्रकुमार सहानी (वय २४) असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी तिचा दीर श्रीमंधर बसंत सहानी याला विक्रमनगर परिसरातून अटक केली आहे.

आरोपी – श्रीमंधर सहानी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुक्मिणी आणि आरोपी श्रीमंधर यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये काही काळापासून वाद होत होते. तसेच श्रीमंधर याचे लग्न रुक्मिणीच्या लहान बहिणीसोबत ठरले असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये वारंवार खटके उडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेच्या दिवशी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर श्रीमंधरने रुक्मिणीच्या डोक्यात हातोड्याने वार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या रुक्मिणीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.
दरम्यान, गांधीनगर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी विक्रमनगर परिसरात सापळा रचून श्रीमंधर सहानी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान हत्येमागील कारणांचा उलगडा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मृत रुक्मिणी आणि आरोपीचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर येथील असून, ते कोल्हापुरातील उचगाव परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. रुक्मिणीचा पती धर्मेंद्रकुमार सहानी फर्निचर फिटिंगचे काम करतो. आरोपी श्रीमंधर हा सरनोबतवाडी परिसरात भाड्याने राहत होता. ३ ऑगस्ट रोजी धर्मेंद्रकुमार कामानिमित्त कणेरी मठ परिसरात गेला असताना ही घटना घडल्याचे तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, हत्येचे नेमके कारण, घटनेमागील परिस्थिती आणि इतर संबंधित बाबींचा पुढील तपास सुरू आहे.


