
एस आय आर प्रकरणी डॉ.रवी पाटील यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा दाखल
बेळगाव: बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न; भाजप नेत्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल
बेळगाव येथे अल्पसंख्याक समाजातील मतदारांची नावे मतदार यादीतून बेकायदेशीरपणे हटवण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीचा वापर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाजप नेते डॉ. रवी पाटील यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात बेळगावच्या मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी बेळगावमधील वीरभद्रनगर येथील मतदान केंद्र क्रमांक १९५ आणि १९६ मध्ये ही घटना घडली. मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म नंबर ७’ चा गैरवापर करून, हयात असलेल्या व कायदेशीररित्या नोंदणीकृत असलेल्या तब्बल १९८ मुस्लिम मतदारांची नावे हटवण्याचा कट रचण्यात आला होता.
या प्रकाराचा संशय आल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळीच भाजप नेते डॉ. रवी पाटील आणि त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांना रोखून या संदर्भात जाब विचारला होता.
बीएलओंच्या तक्रारीनंतर कारवाई
घटनेच्या आठ दिवसांनंतर, म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी प्रभाग क्रमांक १२ च्या बूथ लेव्हल ऑफिसरने (बीएलओ) या प्रकरणी अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीमध्ये भाजप नेते डॉ. रवी पाटील, विजय रुग्णालयाचे कर्मचारी प्रशांत पुढीलमनी आणि शंकर नायक यांच्यासह इतर सहकाऱ्यांची नावे समाविष्ट आहेत.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
बीएलओंच्या तक्रारीवरून मार्केट पोलिसांनी गुन्हा नोंद क्रमांक २१८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४), ३३६(३), ३३६(४), ३५३, ६१(२), ३(५), ३(७), १९२ आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Advertise


