नांगरतास परिसरातील अपघातात कारचा चक्काचूर; एकाची प्रकृती चिंताजनक.
उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड, आजरा, गडहिंग्लज)
आंबोली : आंबोली-नांगरतास परिसरात आज सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रक आणि वॅगनार कारची भीषण धडक झाली. या अपघातात कारमधील केशव दत्ताराम केसरकर आणि संतोष रामचंद्र धुरी (रा. माणगाव, कुडाळ) हे दोघे गंभीर जखमी झाले. यापैकी संतोष धुरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या वॅगनार कारला त्याने जोरदार धडक दिली. धडकेमुळे कारचे मोठे नुकसान होऊन अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार मनीष शिंदे व लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी पोहोचून मायकल डिसूजा, उत्तम नार्वेकर, संतोष पालेकर, दीपक मिस्त्री आणि विशाल सुतार यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास आंबोली पोलीस करीत आहेत.




