हत्ती-कोल्हे-षण्मुगम चषकावर शिवराज, साधनाचे वर्चस्व


शिवराजने साधनाचा पराभव करत १७ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले; १४ वर्षांखालील गटात साधनाने जागृतीवर मात केली.

उपसंपादक : श्री स्वप्निल कुंभार. (गडहिंग्लज, चंदगड, आजरा)

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर आयोजित हत्ती-कोल्हे -षण्मुगम शालेय फुटबॉल चषक स्पर्धेची सांगता उत्साहात झाली. स्पर्धेच्या १५व्या वर्षी १८ संघांनी सहभाग नोंदवला. १७ वर्षांखालील गटात शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलने, तर १४ वर्षांखालील गटात साधना हायस्कूलने विजेतेपद मिळवले.

१७ वर्षांखालील अंतिम सामन्यात शिवराज स्कूलने साधना हायस्कूलचा ४-१ असा पराभव केला. शिवराजच्या आघाडीपटू आलोक पाटीलने दोन गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रेहान भोजगर आणि सिद्धार्थ हूलसार यांनी प्रत्येकी एक गोल केला. साधनाकडून साईश कांबळेने एकमेव गोल केला.

१४ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात साधना हायस्कूलने जागृती हायस्कूलचा ६-० असा एकतर्फी पराभव केला. साधनाच्या सुरज पोवारने हॅट्ट्रिक नोंदवली. शौर्य मल्हारीने दोन, तर काम सुतारने एक गोल करत साधनाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या गटात जागृती हायस्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

१७ वर्षांखालील गटात शिवराजच्या समीन मनेरला उत्कृष्ट गोलरक्षक, साधनाच्या सक्षम राजगिरीला उत्कृष्ट बचावपटू, दर्शन तरवाळला उत्कृष्ट मध्यरक्षक आणि शिवराजच्या अनिरुद्ध पांचाळला उत्कृष्ट आघाडीपटूचा पुरस्कार मिळाला. १४ वर्षांखालील गटात साधनाच्या कार्तिक चव्हाणला गोलरक्षक, विधान खंडाळला बचावपटू, सुरज पोवारला मध्यरक्षक, तर जागृतीच्या कार्तिक देसाईला आघाडीपटूचा पुरस्कार देण्यात आला. शिवराजचा आलोक पाटील आणि जागृतीचा आयन पटेल यांना स्पर्धावीराचा बहुमान मिळाला.

नगरसेवक अमर मांगले, सॉकर चे माजी अध्यक्ष एन. बी. अरळी, साई एज्युकेशन ग्रुपचे विश्वस्त तुषार पाटील, मुख्याध्यापक ए. बी. पाटील, श्रीपाद जोशी आणि गौस मकानदार यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ललित शिंदे यांनी स्वागत केले. स्पर्धा समन्वयक महेश पवार आणि किरण लोखंडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी खेळाडू, प्रशिक्षक तसेच फुटबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!