तक्रारीनंतर पंचायत विस्तार अधिकाऱ्यांची कारवाई; शुक्रवारी कार्यालयाची तपासणी.
उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार (चंदगड,आजरा, गडहिंग्लज)
आजरा : ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत पंचायत विभागाने ग्रामपंचायत कार्यालयाला सील करण्याचे आदेश दिले. मात्र, आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वीच ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लागल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी एस. के. येणगे यांच्या कारभाराबाबत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज केले जात असल्यासह कामकाजाबाबत विचारणा केल्यानंतर समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे कार्यालय सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचायत विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार यांनी बुधवारी दुपारी कारवाई केली. मात्र, कार्यालय सील करण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणीपूर्वीच कार्यालयाला कुलूप लागल्याचे समोर आले.
दरम्यान, शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची चौकशीही पंचायत विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. यावेळी कृषी व पंचायत विस्तार अधिकारी पी. व्ही. चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
आता चौकशीदरम्यान कार्यालयीन कामकाज आणि दप्तरातून नेमके काय समोर येते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. मात्र, ‘दप्तराला सील की कार्यालयाला?’ हा प्रश्न सध्या गावच्या चर्चेचा विषय ठरला आहे.


