नवसपूर्तीसाठी हजारो भक्तांची श्रद्धेची पावले ; दोन मिनिटांच्या मुखदर्शनासाठी ४ किलोमीटरची रांग!
संकेश्वर प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
संकेश्वर येथील प्रसिद्ध श्री निलगार गणपतीच्या दर्शनासाठी सध्या भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. २१ दिवसांच्या उत्सवाची सांगता आणि गणपती विसर्जनासाठी अवघे दोन-तीन दिवस शिल्लक राहिल्याने दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत भक्तांच्या रांगा लागल्याचे चित्र सध्या संकेश्वरमध्ये पाहायला मिळत आहे.
निलगार गणपतीबद्दल भाविकांमध्ये असलेली श्रद्धा आणि नवसपूर्तीची भावना या गर्दीमागील प्रमुख कारण ठरत आहे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, केलेला नवस पूर्ण व्हावा आणि गणरायाचा आशीर्वाद मिळावा, या भावनेने महाराष्ट्र, कर्नाटकासह विविध भागांतून भाविक संकेश्वरकडे येत आहेत. अनेक तास रांगेत उभे राहूनही गणपतीचे दर्शन मिळण्याची आस त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
गर्दीमुळे स्थानिक नागरिक तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांना वाहतूक, पार्किंग आणि इतर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मात्र, या सर्व त्रासावर श्रद्धा भारी ठरत असून, अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर गणरायाचे अवघ्या दोन मिनिटांचे मुखदर्शन मिळाले तरी तो क्षण भक्तांसाठी अत्यंत अमूल्य ठरत आहे.
‘गर्दी कितीही असो, वाट कितीही लांब असो; आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घ्यायचेच’ या भावनेने भाविकांची पावले निलगार गणपतीच्या दिशेने सुरू आहेत. विसर्जनापूर्वीच्या या शेवटच्या दिवसांत संकेश्वरमध्ये भक्तीचा हा महासागर अधिकच वाढताना दिसत असून, निलगार गणपतीवरील भाविकांची अढळ श्रद्धा या गर्दीतून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

