तळावडेच्या लेकीचा बेळगाव क्रीडाक्षेत्रात दरारा 


तळावडेच्या लेकीचा बेळगाव क्रीडाक्षेत्रात दरारा 

राज्यस्तरीय निवडीसाठी सराव सुरू

खानापूर: राजू कुंभार

ग्रामीण भागातील मुली क्रीडा क्षेत्रात अथांग इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर काय करू शकतात, याचे उत्तम उदाहरण तळावडे गावची सुपुत्री पैलवान समीक्षा श्रीपाद उशीनकर हिने सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच १८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत समीक्षाने ५० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.

सध्या बेळगाव येथील जिजामाता हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेली समीक्षा ही क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी समर्पितपणे मेहनत घेत आहे. तिने कुस्तीतील कौशल्याची चुणूक दाखवत जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून, आता तिची नजर आगामी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेवर (State Selection) लागली आहे.

राज्यस्तरीय निवडीच्या जोरदार तयारीसाठी समीक्षा सध्या बेळगाव येथील डीवाइस हॉस्टेलमध्ये राहून कठोर सराव करत आहे. तिच्या या यशात आणि क्रीडा प्रवासात मुख्य प्रशिक्षक स्मिता पाटील तसेच मंजुनाथ सर, वडील श्रीपाद उशीनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या समीक्षाच्या या नेत्रदीपक यशामुळे तळावडे गाव आणि जिजामाता हायस्कूलचे नाव बेळगाव जिल्ह्यात उंचावले आहे. क्रीडा वर्तुळातून आणि गावकऱ्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!