
जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सेंट पॉल स्कूलचे यश
विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी चार विद्यार्थ्यांची निवड
खानापूर : शिवाजीनगर, खानापूर येथील सेंट पॉल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले. उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर सेंट पॉल स्कूलच्या संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात करत हे यश संपादन केले.
या शानदार कामगिरीनंतर खानापूर विभागीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेसाठी सेंट पॉल स्कूलच्या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुशल बेलगांवकर, वियोम कलाल, यश्वदीप मादार आणि विश्वदीप मादार यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाल्याने शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी भर पडली आहे.
या विजयामागे विद्यार्थ्यांची मेहनत, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य आणि प्रोत्साहन यांचा मोठा वाटा आहे. आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी आपला वेळ देऊन सामने पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित राहत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सामन्यात पालकांनी दिलेले प्रोत्साहन आणि घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत.
या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य फादर राहुल डी., क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


