जामगावच्या पोरांकडून देगावात हाणामारी
देगाव-जामगाव वाद पेटला: अॅडव्हान्सच्या पैशांवरून देगावात तुंबळ हाणामारी; अनेकजण किरकोळ जखमी
खानापूर: प्रतिनिधी
कामाचे अॅडव्हान्स घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून जामगाव आणि देगावच्या गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना देगाव येथे घडली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून रंगलेल्या या वादात दोन्ही बाजूंकडील अनेकजण किरकोळ जखमी झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण भीमगड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, देगाव येथील एका गवंड्याने वर्षभरापूर्वी जामगाव येथील एका मेस्त्रीकडून “कामावर येतो” असे सांगून एक मोठी रक्कम अॅडव्हान्स म्हणून घेतली होती. मात्र, पैसे घेतल्यानंतरही संबंधित गवंडी कामावर हजर झाला नाही. वारंवार तगादा लावूनही पैसे परत मिळत नसल्याने, अखेर जामगावच्या मेस्त्रीने जामगाव येथील काही तरुणांना सोबत घेऊन देगाव गाठले.
बैठकीतच उडाला भडका
देगावात या आर्थिक व्यवहारावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंच्या लोकांची एक बैठक बोलावण्यात आली होती. चर्चेदरम्यान पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली आणि सुरुवातीला हा व्यवहार संपल्यासारखा वाटत होता. मात्र, अचानक किरकोळ वादावरून दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले.
गावात राडा आणि दहशत
जामगावच्या तरुणांनी देगावात तुफान राडा घातल्याने काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवल्याने दोन्ही बाजूंचे लोक किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर संपूर्ण भीमगड परिसरात या तुंबळ हाणामारीची आणि पैशांच्या वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची घाईगडबड सुरू आहे.
माजी आमदारांचा मध्यस्थीचा प्रयत्न
समीतिचे माजी आमदार दोन्ही गावच्या लोकांत वाद मिटविण्यासाठी धावले आहेत. दोन्हीकडील मंडळी त्याचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यासमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.
जाहिरात advertise,………



