सवतकडा धबधब्यावर तरुणाचा बळी.


१८ वर्षीय युसूफ शेखचा पाण्यात बुडून मृत्यू.

चंदगड प्रतिनिधी :

चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथील १८ वर्षीय युवकाचा भुदरगड तालुक्यातील सवतवकडा धबधबा परिसरात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. युसूफ मेहबूब शेख असे मृत युवकाचे नाव असून तो इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, युसूफ हा आपल्या कुटुंबीयांसह पर्यटनासाठी सवतवकडा धबधबा परिसरात आला होता. धबधब्याच्या पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे शोधमोहीम थांबवून आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

पर्यटकांची वाढती गर्दी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सवतवकडा धबधबा परिसरात पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार व महसूल मिळत असला, तरी वाढत्या गर्दीच्या तुलनेत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना पुरेशा आहेत का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. प्रशासन व वनविभागाने धोकादायक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावीपणे राबवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!