न्यु होरायझनच्या विद्यार्थिनींची माणुसकीची राखी, अनोखे बंध


न्यू होरायझनच्या विद्यार्थिनींची निवासी मूकबधिर शाळेला भेट; राख्या बांधून विद्यार्थ्यांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा आनंद

गडहिंग्लज प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

न्यू होरायझन स्कूल, औरनाळ येथील विद्यार्थिनींनी  गडहिंग्लज-कडगाव रोडवरील निवासी मूकबधिर शाळेला भेट देत रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी तेथील विद्यार्थ्यांना राख्या बांधून व गोड खाऊ भरवत बहीण-भावाच्या नात्याचा प्रेमळ धागा गुंफला.

यावेळी निवासी मूकबधिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरिता रजपूत यांनी न्यू होरायझन स्कूलच्या विद्यार्थीनी व शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी, “आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजरे करणे स्वाभाविक आहे; मात्र विशेष विद्यार्थ्यांसोबत हा सण साजरा करून तुम्ही प्रेम व माणुसकीचा सुंदर संदेश दिला आहे. ही प्रेमभावना कायम जपा,” असे सांगितले.

शाळेचे कलाशिक्षक श्री. स्वप्निल कुंभार यांनी रक्षाबंधनाचा हा उपक्रम विशेष विद्यार्थ्यांसोबत का साजरा करण्यात आला, यामागील भूमिका स्पष्ट केली. “रक्ताचे नाते असो वा नसो, माणुसकीचे नाते मनात जिवंत ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.”

विशेष शाळेतील विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन, त्यांना दिले जाणारे शिक्षण, संवाद साधताना येणाऱ्या अडचणी आणि संवादासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती जाणून घेताना न्यू होरायझनच्या विद्यार्थिनी भावुक झाल्या. आपल्या न्यु होरायझन शाळेच्या बहिणींनी राख्या बांधल्याचा आनंद मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला.

यावेळी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी आराध्या पवार हिने विशेष शाळेतील विद्यार्थ्यांसोबत घालवलेल्या वेळेतील अनुभव उपस्थितांसमोर व्यक्त केला.

रक्षाबंधनाचे औचित्य साधून या क्षेत्रभेटीचे नियोजन मुख्याध्यापिका सौ. सुनीता डी. पाटील, कला विभाग प्रमुख श्री. स्वप्निल कुंभार व सहाय्यक कलाशिक्षिका सौ. आरती नाईक यांनी केले. यावेळी दोन्ही शाळांतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. श्री कुंभार यांनी मूकबधिर शाळेच्या मुख्याध्यापिका, श्री पाटील सर व सर्व स्टाफ चे देखील आभार मानले.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!