जिल्हा परिषद शाळांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गाड्या अडवून घातली हुज्जत. कळसगादे तील चौघांवर गुन्हा दाखल
चंदगड प्रतिनिधी : स्वप्नील कुंभार
जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी करण्यासाठी आलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. जास्मिन आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्या ताफ्यातील वाहने अडवून हुज्जत घालण्याचा खळबळजनक प्रकार कळसगादे (ता. चंदगड) येथे घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
**शाळेला भेट न दिल्याने गावकऱ्यांचा संताप**
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२७ ऑगस्ट २०२६) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. जास्मिन आणि आमदार शिवाजीराव पाटील यांचा चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा पाहणी दौरा सुरू होता. दौरा संपवून आमदार आणि सीईओंची गाडी पुढे निघून गेल्यानंतर, कळसगादे गावातील रस्त्यावर चार जणांनी संगनमत करून ताफ्यातील इतर वाहने अडवली.
“आमच्या कळसगादे गावातील शाळेला भेट देणे नियोजित असताना तुम्ही भेट न देता का जात आहात?” असा जाब विचारत त्यांनी सीईओंचे सरकारी वाहन, आमदारांच्या सुरक्षा रक्षकांची गाडी आणि सोबत असलेले कार्यकर्ते लक्ष्मण गावडे (रा. झांबरे) यांचे वाहन अडवून जोरदार हुज्जत घातली.

**चौघांवर गुन्हा दाखल**
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील महेश सुतार (वय २८,
- चंदगड पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १)दौलत मारुती दळवी, २)शिवाजी गोपाळ सुतार. ३)गणपत गुंडू सुतार, ४)मनोहर तुकाराम दळवी (सर्व रा. कळसगादे, ता. चंदगड)
चंदगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम १२६(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या मुखोद्गत आदेशानुसार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल (म.पो.हे.कॉ. २०७९) चौगुले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


