
राजकीय भीतीने अरविंद पाटील अन् दोड्डगौडरांनी कर्ज अडविले
मलप्रभा’ला सुरुंग लावण्याचा डाव!
खानापूर : राजू कुंभार
मलप्रभा सहकारी साखर कारखान्याचा विकास झाला, तर आपल्या राजकीय अस्तित्वालाच सुरुंग लागेल, या निव्वळ राजकीय भीतीने पछाडलेल्या माजी आमदार अरविंद पाटील आणि महांतेश दोड्डगौडर आणि यांनी कारखान्याची कोंडी करण्याचा कुटील डाव रचला आहे, असा घणाघाती आरोप कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी केला. नुकताच त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
BDCC(जिल्हा मध्यवर्ती बँक) बँकेकडून मंजुरीच्या टप्प्यात असलेल्या ५५ कोटींच्या कर्जात जाणीवपूर्वक अडथळे आणून शेतकऱ्यांच्या हक्काच्या कारखान्याला रोखण्याचा हा हीन दर्जाचा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Advertise

दोन्ही माजी आमदारांनी बँक प्रशासनावर दबाव आणून ५५ कोटींचे कर्ज रोखले तरी आम्ही डगमगलो नाही. शेतकरी आणि कारखान्याचे हित जपण्यासाठी अण्णासाहेब जोल्ले यांच्या बँकेकडून ४० कोटींचे कर्ज उभारून कारखान्याची चाके पूर्ववत फिरवली आहेत, असे हट्टीहोळी यांनी स्पष्ट केले.
४ लाख मेट्रिक टन गाळपाचे उदिष्ट असून कारखान्यापासून २० किमी परिसरातील ऊस तोडणी व वाहतुकीसाठी १६ कोटी रुपयांची उचल (ॲडव्हान्स) देऊन २३२ ऊस तोडणी टोळ्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. .राजकीय अडथळे बाजूला सारत यंदाच्या हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे आणि ११.५०% साखरेचा उतारा (रिकव्हरी) मिळवण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
गेल्या हंगामात २.३१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११.३४% उतारा मिळवला होता. सर्व शेतकऱ्यांची थकीत बिले पूर्णपणे अदा करण्यात आली आहेत.
१७ कोटींच्या घोटाळेबाजांवर कठोर कारवाईचा बडगा कारखान्यात झालेला १७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला असून त्याचा सविस्तर तपास अहवाल प्राप्त झाला आहे. याप्रकरणी गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला असून, शेतकऱ्यांचा पैसा लाटणाऱ्या एकाही दोषीला सोडणार नाही; त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
चुकीच्या अफवांना पूर्णविराम आगामी निवडणुकांबाबत बोलताना, कित्तूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार बाबासाहेब पाटील हेच निवडणूक लढवतील, आपण स्वतः या शर्यतीत इच्छुक नाही, असे सांगत हट्टीहोळी यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.
Advertise




