नागुर्डा,वाडा, विश्रांतवाडीच्या गणेश विसर्जन स्थळाची तरुणांकडून स्वच्छ्ता 


नागुर्डा,वाडा, विश्रांतवाडीच्या गणेश विसर्जन स्थळाची तरुणांकडून स्वच्छ्ता 

ग्रा. पं च्या मदतीने झुडपे हटवून रस्ता केला मोकळा 

खानापूर: राजू कुंभार

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, बाप्पाच्या आगमनासह विसर्जनाची तयारीही सर्वत्र वेगाने सुरू झाली आहे. नागुर्डा, वाडा आणि विश्रांतवाडी या तिन्ही गावांचे संयुक्त गणेशमूर्ती विसर्जन स्थळ स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी विश्रांतवाडीतील तरुणांनी पुढाकार घेत एक कौतुकास्पद आदर्श निर्माण केला आहे.

विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाढलेली रानटी झुडपे आणि साचलेला कचरा यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन विश्रांतवाडीतील कृष्णा झुंजवाडकर,वासुदेव झुंजवाडकर, ज्योतिबा (भय्या)चव्हाण, लक्ष्मण झुंजवाडकर, बबलू कुंभार, विनायक कांबळे आदिंसह ग्रामस्थ व तरुणांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली. ग्रामपंचायत विकास अधिकारी प्रवीण सायनक यांच्या विशेष सहकार्यातून आणि मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.

जेसीबी आणि स्थानिक साधनांच्या मदतीने रस्त्यावरील अडथळा ठरणारी काटेरी झुडपे हटवून विसर्जन मार्ग पूर्णपणे मोकळा व सुरक्षित करण्यात आला. तसेच, विसर्जन घाटाची योग्य साफसफाई करून परिसराचा कायापालट करण्यात आला आहे.

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही भाविकाला अथवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही त्रास होऊ नये, या सामाजिक जाणिवेतून तरुणांनी हे पाऊल उचलले. ग्रामपंचायतीचे सहकार्य आणि तरुणांच्या या उत्स्फूर्त श्रमदानाचे गावकर्यातून भरभरून कौतुक होत आहे.

Advertise


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!