दिलदार व्यक्तिमत्त्व रियाजभाई यांचे निधन; वाढदिवसाच्या दिवशीच निपाणीसह गडहिंग्लजवर शोककळा.


शून्यातून विश्व निर्माण करणारे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व हरपले; वाढदिवसाच्याच दिवशी काळाचा क्रूर घाला.

गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्नील कुंभार.

शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक दिलदार, प्रेमळ व मनमिळावू व्यक्तिमत्त्व डॉ. रियाजभाई शमनजी यांचे दुःखद निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता, त्याच दिवशी त्यांच्या जीवनाची प्राणज्योत मालवल्याने नियतीच्या या क्रूर योगायोगाने नागरिकांचे मन हेलावून गेले आहे.

​वाढदिवसाच्या दिवशीच काळाचा घाला

रियाजभाई दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज व परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून तो दिवस समाजासाठी समर्पित करत असत. मात्र, यंदाच्या वाढदिवशीच त्यांना असा अचानक निरोप देण्याची वेळ येईल, असे कोणाच्याही स्वप्नात नव्हते. अरमान शमनजी यांच्या भावनिक पोस्टनंतर अनेक नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी मनोभावे प्रार्थना केली होती, परंतु अखेर नियतीपुढे सर्वच हतबल ठरले.

​शून्यातून उभे केले शैक्षणिक व सामाजिक साम्राज्य

रियाजभाई यांनी अतिशय कष्टाने व स्वतःच्या कर्तृत्वाने शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी गाावातील विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा गरजूंना मदत असो, कोणतीही प्रसिद्धी न मिळवता नेहमीच सढळ हाताने मदत केली. मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले.

​माणुसकी जपणारे आणि नाती जपणारे हे दिलदार व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेल्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

अंत्यविधी 

उद्या, गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता त्यांचे पार्थिव नेसरी येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये, तर सकाळी १०:०० वाजता बहिरेवाडी येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२:०० वाजता रियाजभाई यांचे मूळ गाव कडगाव (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथे त्यांच्यावर दफनविधी पार पडणार आहे.


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!