खानापूर PLD बँकेचा कारभार संशयास्पद?
AGM वर माजी संचालक कल्लाप्पा घाडींचा आक्षेप!
बेळगाव / खानापूर:सहकार क्षेत्राला ग्रासलेली अपारदर्शकता आणि मनमानी कारभाराचा आणखी एक नमुना खानापूर येथील प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत (PCARD Bank Ltd., Khanapur) उघडकीस आला आहे. बँकेच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) पार्श्वभूमीवर सभासदांचे कायदेशीर अधिकार तुडवले जात असल्याचा गंभीर आरोप करत संस्थेचे माजी संचालक तक्रारदार कल्लाप्पा एम. घाडी यांनी संस्थेच्य गलथान कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे.
१६ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांनी बेळगाव जिल्ह्याच्या सहकारी संस्था उपनिबंधक आणि राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे रीतसर तक्रार नोंदवून बँकेच्या कारभारावर आसूड ओढले आहेत.
माहिती लपवून सभासदांची दिशाभूल करण्याचा घाट?
२०२५-२६ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा तोंडावर आली असताना, बँकेने अद्याप ३१ मार्च २०२६ ची ऑडिटेड बॅलन्सशीट, नफा-तोटा पत्रक, वार्षिक अहवाल आणि ऑडिट अहवालातील मुख्य निरीक्षणे सभासदांना उपलब्ध करून दिलेली नाहीत. सहकार तत्त्वांची पायमल्ली करत वित्तीय आकडेवारी आणि ऑडिट मधील त्रुटी सभासदांपासून जाणीवपूर्वक दडपण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा रास्त संशय या प्रकारामुळे निर्माण झाला आहे.
कायद्याला हरताळ आणि आश्वासनांची हवेत उधळण!
कर्नाटक सहकारी संस्था नियम, १९६० मधील ‘Rule 14-AJ, sub-rule (4)’ चे उघड उल्लंघन करून बँक प्रशासन सहकार कायद्याला थेट आव्हान देत आहे. विशेष म्हणजे, मागील सर्वसाधारण सभांमध्ये “पुढील वेळी सर्व कागदपत्रे वेळेत पुरवू” अशी पोकळ आश्वासने देऊन सभासदांची तोंडे गप्प करण्यात आली होती. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही आश्वासनांना केराची टोपली दाखवत बँक प्रशासनाने आपली हुकूमशाही वृत्ती कायम ठेवली असल्याचा घणाघाती आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या आक्रमक मागण्या:
* सहकार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बँक प्रशासनाला तातडीने सर्व वैधानिक अहवाल सभासदांना देण्याचे कडक निर्देश द्यावेत.
* AGM च्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने संपूर्ण प्रक्रियेची वैधानिक चौकशी (Statutory Audit & Inquiry) करण्यात यावी.
* सर्व कागदपत्रे मिळेपर्यंत आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रस्तावित AGM तात्काळ स्थगित (Postpone) ठेवण्यात यावी.
* तपासणीत दोषी आढळणाऱ्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर व दंडात्मक कारवाई व्हावी.
सहकारातील लोकशाही मूल्यांचा संकोच करणाऱ्या अशा कारभारामुळे सभासदांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, आता सहकार खाते या मनमानी कारभारावर चाबूक चालवणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Advt


