वागळे कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा
ता. खानापूर : तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत खानापूर येथील रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी सांघिक तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
सांघिक स्पर्धांमध्ये मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर मुलींच्या खो-खो संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळविला.
वैयक्तिक स्पर्धांमध्येही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली छाप पाडली. कु. ज्ञानदेव शिंदे याने ३००० मीटर धावणे तसेच ५००० मीटर क्रॉस-कंट्री धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. कु. प्रज्वल सावंत याने गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक, तर कु. इंदू गावडे हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. कु. परशुराम गावडे याने ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळविला.
विशेष म्हणजे, वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शरयू कदम आणि क्रीडा प्रशिक्षक प्रा. शंकर गावडा यांच्यासह संदीप पाटील, गुंडू कोडला, डी. व्ही. पाटील, इमिलिया फर्नांडिस, सोनी गुंजीकर, रेणुका पाटील आणि खेमराज गडकरी यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन, संचालक, सेक्रेटरी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी आणि क्रीडा विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Advertise…..



