नवरात्रोत्सवात डॉल्बीला आळा; आजरा नवरात्रौत्सव मंडळांचा निर्णय


शांतता आणि सामाजिक सलोखा जपत उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद.

आजरा प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

     आजरा शहरात यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याबरोबरच ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याचा निर्णय विविध नवरात्रोत्सव मंडळांनी घेतला आहे. उत्सव काळात डॉल्बीचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यावर मंडळांनी भर दिला आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आणि ध्वनिप्रदूषणास प्रतिबंध करणे याबाबत चर्चा करण्यात आली.

पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत डॉल्बीमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे यंदाच्या उत्सवात पारंपरिक वाद्ये, सांस्कृतिक उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

या बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल सर , अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्यासह शहरातील विविध नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


107
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!