ज्येष्ठ नागरिक आणि महीला ई बसपास (NCMC) साठी मुदतवाढ
१ सप्टेंबरपर्यंत मुदत,प्रवाशांना मोठा दिलासा
स्वप्निल कुंभार:(उपसंपादक- चंदगड, आजरा व गडहिंग्लज)
एसटी प्रवासात राज्य शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलतींसाठी एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड १ ऑगस्टपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, राज्यभरातील अनेक पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप हे कार्ड प्रत्यक्षात मिळालेले नाही. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिलीआहे. राज्य सरकारकडून एसटी प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के सवलत, अमृत महोत्सवी ज्येष्ठांना मोफत प्रवास अशी विशेष सवलत दिली जाते. याच सर्व सवलती अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ई बस पास ( एनसीएमसी स्मार्ट कार्ड) देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
राज्यभरातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी अर्ज केले आहेत, मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. केवळ कार्ड वितरणातील विलंबामुळे पात्र नागरिकांना शासनाच्या सवलतींपासून वंचित राहावे लागू नये, याची गंभीर दखल परिवहन विभागाने घेतली आणि या सक्तीला एक महिन्याची मुदतवाढ दिली.





