नंदगड भागातील भात पिके होरपळी; शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ


नंदगड भागातील भात पिके होरपळी; शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ

सोसायट्या आणि बँकांची कर्जे कशी भरणार? शेतकऱ्यांचा सवाल

नंदगड : प्रतिनिधी

जून महिन्यात झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्यानंतर ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने भात पिकाला आधार मिळाला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाने पुन्हा दडी मारल्याने नंदगड परिसरातील भात पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. पिकाला आवश्यक त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने अनेक ठिकाणी भात पिके होरपळू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. नंदगड गावातून गवळी वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्या शेजारील संपूर्ण भाग शेती करपून गेली आहे अशी माहिती तेथील रहिवासी शेतकरी राजू कुलकर्णी यांनी ग्रामदूतशी बोलताना दिली.

भात पीक सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहे. याच काळात पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांना आता पिकाला पाणी देण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

परिसरातील सर्व शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने अडचणी आणखी वाढल्या आहेत. विहीर, कूपनलिका किंवा अन्य जलस्रोत असलेल्या शेतकऱ्यांना पिकाला पाणी देणे शक्य होत असले, तरी पाण्याचे स्रोत मर्यादित असल्याने पुढील काळात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.

शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी सोसायट्या आणि बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, भात उत्पादनावरच संकट आल्याने हे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

“पिकाचे नुकसान झाले तर कर्जाची परतफेड कशी करायची? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा?” अशी चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

प्रशासनाने नंदगड परिसरातील भात पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घ्यावा आणि पावसाअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करावी, अशी मागणी होत आहे.

 राजू कुलकर्णी(नंदगड, शेतकरी)

Advertise….


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!