’आपला दवाखाना’ कंपाऊंडरच्या जिवावर; ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तीव्र तुटवडा, आंदोलनाचा इशारा.
चंदगड प्रतिनिधी: श्री. स्वप्निल कुंभार.
चंदगड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची दैना उडाली असून स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरातील ‘आपला दवाखाना’ या केंद्रामध्ये गेल्या ५-६ महिन्यांपासून एकही वैद्यकीय अधिकारी कार्यरत नाही. केवळ नाममात्र उच्च वैद्यकीय अधिकारीच नव्हे, तर बी.ए.एम.एस. अथवा बी.एच.एम.एस. डॉक्टरही उपलब्ध नसल्यामुळे या दवाखान्याचा संपूर्ण कारभार कंपाऊंडरच्या भरोशावर चालवला जात असल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण रुग्णालयातही समस्यांचा डोंगर:
केवळ प्राथमिक केंद्रच नाही, तर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची स्थितीही अत्यंत चिंताजनक आहे. येथे एमबीबीएस डॉक्टरांसह नेत्ररोगतज्ज्ञ व दंतवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. याशिवाय, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या मोफत औषधांचीही मोठी चणचण भासत आहे. ताप, सर्दी आणि खोकल्यासारख्या सामान्य आजारांवरील सिरप आणि औषधे उपलब्ध नसल्यामुळे गरिबांना ती औषधे खाजगी फार्मसीमधून विकत घ्यावी लागत आहेत. यासंदर्भात सीपीआर (CPR) रुग्णालयाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
”ग्रामीण रुग्णालयात तात्काळ पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करून न दिल्यास तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल.” — एकनाथ वाके, शिरगाव
स्थानिक प्रशासनाने आरोग्य व्यवस्थेकडे तातडीने लक्ष देऊन या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी नागरिक व रुग्णांकडून केली जात आहे.

