
मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श! मयूरच्या स्मृतीसाठी लोकोळीत वही-पेन वाटप उपक्रम
खानापूर: राजू कुंभार
असाध्य आजाराशी झुंज देत वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या चिमुकल्या मयूर जोतिबा पाटील याच्या स्मृती जपण्यासाठी पाटील परिवाराने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
लोकोळी (ता. खानापूर) येथील चिमुकल्या मयूरचा २८ सप्टेंबर २०१३ रोजी बांबोळी (गोवा) येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मुलाच्या निधनाचे दुःखाश्रू अनावर झालेल्या प्रसंगीही वडील जोतिबा पाटील यांनी अत्यंत खंबीरपणा दाखवत मयूरचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यांच्या या उदात्त निर्णयामुळे दोन अंध व्यक्तींना नवी दृष्टी मिळाली असून मयूरचे नाव अजरामर झाले.
याच सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे चालवत, पाटील परिवाराने मयूरच्या स्मृतिदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचे ठरवले आहे. “हा उपक्रम कोणत्याही निधी संकलनासाठी नसून मयूरच्या स्मृती जपण्यासोबतच चार बालकांना शिक्षणासाठी मदत व्हावी, हीच यामागील साधी भावना आहे,” असे जोतीबा पाटील यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमासाठी अनेक ग्रामस्थांनी व सेवाभावी व्यक्तींनी स्वेच्छेने पुढाकार घेतला असून, ज्यांना या छोट्याशा शैक्षणिक सेवेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी ९८४४२८८४३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. चिमुकल्याच्या मृत्यूनंतरही समाजात प्रकाशाचा आणि ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Advertise….


