आजरा तालुक्यात ‘लोक अदालत अभियान’


महसुली वादांवर परस्पर सहमतीने होणार कायमचा पडदा;  महात्मा जोतिराव फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त ३१ मार्च २०२७ पर्यंत तीन टप्प्यांत विशेष उपक्रम.

आजरा प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

             जमीन, रस्ते, फेरफार नोंदी आणि विविध महसुली दाव्यांच्या निकालासाठी वर्षानुवर्षे तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या नागरिकांना आता परस्पर तडजोडीतून वाद मिटवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे आजरा तालुक्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबवण्यात येत आहे.

​क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत संपूर्ण राज्यभरात हे अभियान तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पार पडणार आहे.

​या प्रकरणांचा होणार निपटारा

अभियानाअंतर्गत मंडळ अधिकारी स्तरावरील फेरफार नोंदींशी संबंधित तक्रारी, तसेच नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी स्तरावरील प्रलंबित महसुली अपील व अर्जांचा समावेश असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांसंबंधीचे दावे, मामलेदार न्यायालय अधिनियमातील कलम ५ अंतर्गत येणारे रस्ता विवाद, भूसंपादन भरपाई आणि इतर प्रलंबित महसुली प्रकरणांचा परस्पर सामंजस्याने निकाल लावला जाईल.

​अभियानाचे नियोजनबद्ध टप्पे

​पहिला टप्पा: १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ (यादरम्यान ७ ते १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अर्जांची छाननी करून कायदेशीर तडजोडनामा तयार केला जाईल आणि १० ऑक्टोबर रोजी ‘महसूल लोक अदालत’ आयोजित केली जाईल. दोन्ही बाजूंच्या सहमतीनंतर अंतिम निकाल घोषित केला जाईल.)

​दुसरा टप्पा: १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६

​तिसरा टप्पा: १ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७

​वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील पक्षकारांनी या विशेष संधीचा फायदा घेऊन परस्पर संमतीने आपले वाद कायमचे मिटवून घ्यावेत, असे आवाहन आजरा तहसीलदारांकडून करण्यात आले आहे.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!