सडेगुडवळे आढळला महिलेचा सडलेला मृतदेह
चंदगड: स्वप्नील कुंभार
चंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून नुकताच सडेगुडवळे येथे एका २५ ते ३० वयोगटातील अज्ञात महिलेची गळा आवळून हत्या केल्याची आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
२ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास सडेगुडवळे गावाच्या हद्दीत, बेळगाव ते वेंगुर्ला मेन रोडपासून आत पांडुरंग सुतार यांच्या खडी क्रेशर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या आतील बाजूस, अरुण पांडुरंग काकडे यांच्या मालकीच्या शेतात अर्धवट जळालेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. अज्ञात आरोपीने या महिलेचा गळा आवळून किंवा गुदमरून खून केला आणि ओळख पटू नये म्हणून मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर मृतदेहाच्या डाव्या हातात पांढऱ्या धातूचे ब्रेसलेट आणि अनामिका बोटात अंगठी असून मृतदेह अर्धवट जळालेल्या, कुजलेल्या आणि प्राण्यांनी कुरतडलेल्या स्थितीत आढळला आहे.
सडेगुडवळे येथील पोलीस पाटील सौ. शितल लाडु गावडे यांच्या बातमीवरून चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २९७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि २३८ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी वैद्यकीय टीमकडून इनक्वेस्ट पंचनामा करण्यात आला. पोलीस निरीक्षक चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीचा शोध सुरूआहे.





