
श्री.स्वप्निल कुंभार(उपसंपादक- चंदगड, आजरा व गडहिंग्लज)
कोल्हापूर शहरातील कळंबा रिंग रोडलगतच्या सुर्वे नगर परिसरात बुधवारी रात्री जिलेटीन स्फोट करणाऱ्या तिघांना पोलिसांनी 24 तासात जेरबंद केले.
प्रज्योत दीपक पवार (रा. बापूरामनगर, कळंबा), अभिजित प्रभाकर चौगले आणि प्रसाद दीपक चौगले ( दोघे रा. परिते, ता. करवीर) या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली. पुढील तपासासाठी त्यांना करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित बंगल्याबाबत घरमालकीचा वाद असल्याची चर्चा असून, त्यातूनच हा प्रकार घडविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या स्फोटामागील नेमके कारण, त्यामागील सूत्रधार आणि वापरण्यात आलेल्या स्फोटकाचे स्वरूप याचा सर्वंकष तपास पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.




