सोशल मीडिया संपर्कातून तरुणासोबत गेल्याचा संशय; पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे संभाव्य अनर्थ टळला

कोडोली (कोल्हापूर) प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार
आईला कोल्ड्रिंक आणून लगेच परत येते, असे सांगून घराबाहेर पडलेली दहा वर्षांची मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे खळबळ उडाली. सदर मुलगी एका १ वर्षीय मुलासोबत गेल्याचे समोर आल्यानंतर पालकांनी तत्काळ कोडोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुलगी एका दुचाकीवरून संबंधित मुलासोबत शहापूरच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या सोशल मीडिया संपर्कांसह संबंधित व्यक्तींची माहिती घेत तपासाला वेग दिला.
तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल माहितीच्या आधारे पोलिसांनी शहापूर परिसरातील एका निर्जन शेडमध्ये मुलीचा शोध घेतला. अवघ्या २४ तासांत मुलीचा शोध लागल्याने संभाव्य अनर्थ टळला. या प्रकरणातील समाधान उमेश चौगुले या १९ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरासह ऑनलाइन संपर्क आणि डिजिटल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालकांनी मुलांच्या ऑनलाइन व्यवहारांबाबत सतर्क राहून त्यांना सुरक्षित इंटरनेट वापराबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.


