कबनाळीकरांचा संताप! रस्ता कधी होणार?
डांबरीकरणासाठी अडीच वर्षांपासून पाठपुरावा; शंकरशास्त्री व दीपक शास्त्री यांचे आमदारांकडे साकडे
खानापूर : राजू कुंभार
निलावडे पंचायत क्षेत्रातील दुर्गम कबनाळी गावाला जोडणारा सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता अद्याप डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याने ग्रामस्थांच्या अडचणी कायम आहेत. रस्त्याअभावी गावात बससेवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होत असून, शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अडीच किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत असल्याची समस्या समोर आली आहे.
कबनाळी गावाचा हा रस्ता तातडीने डांबरीकरण करून मंजूर करावा, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य शंकरशास्त्री आणि युवा सामाजिक कार्यकर्ते दीपक शास्त्री यांनी पत्रकार प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे केली आहे.
बस नाही, सुविधा नाही; विद्यार्थ्यांची पायपीट मात्र कायम!
गावात जाणारा रस्ता डांबरी नसल्यामुळे नियमित बससेवा सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे शंकरशास्त्री व दीपक शास्त्री यांनी म्हटले आहे. परिणामी, शाळा-कॉलेजसाठी खानापूरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना रस्ता गाठण्यासाठी अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
विशेषतः पावसाळ्यात या समस्येची तीव्रता वाढते. दुर्गम भागातील गावांना मूलभूत वाहतूक सुविधा मिळणे गरजेचे असताना कबनाळीकरांना अजूनही रस्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अडीच वर्षे पाठपुरावा, आश्वासनानंतरही रस्ता प्रतीक्षेत
या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी गेल्या अडीच वर्षांपासून आमदारांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचा दावा शंकरशास्त्री व दीपक शास्त्री यांनी केला आहे. रस्ता मंजूर करण्याचे आश्वासनही मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, खानापूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी ‘प्रगतीपथ’ अंतर्गत अनेक रस्त्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती २०२५ मध्ये आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली होती. त्यामध्ये मुघवडे-कबनाळी रस्त्याचाही समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, कबनाळी गावाला प्रत्यक्ष सुविधा कधी मिळणार? हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
दुर्गम गावाला रस्ता मिळणे ही सुविधा नसून मूलभूत गरज आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
‘आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम सुरू करा’
कबनाळी गावाचा अडीच किलोमीटरचा रस्ता लवकरात लवकर मंजूर करून डांबरीकरणाचे काम सुरू करावे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांची होणारी पायपीट थांबेल,
दीपक शास्त्री (सामाजिक कार्यकर्ते)
Advertise





