तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शिवठण हायस्कूल दमदार
हॉलीबॉल संघ प्रथम; वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी
शिवठण : प्रतिनिधी
श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, येळूर संचलित श्री रावळनाथ हायस्कूल, शिवठण, ता. खानापूर येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. हॉलीबॉल स्पर्धेत विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले.
उत्कृष्ट सांघिक खेळ, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले. हॉलीबॉल संघाचे कर्णधार कुमार लक्ष्मण मादार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच त्यांनी सहकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही चमक
स्पर्धेतील विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली.शंभर मीटर रिलेमध्ये वैभवी पाटील, पवित्रा परिट, नम्रता पाटील आणि दिपाली शिरोडकर यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.उंच उडीमध्ये नम्रता पाटील हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर लांब उडीमध्ये दिपाली शिरोडकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.तिहेरी उडीमध्ये नम्रता पाटील हिने द्वितीय, तर वैभवी पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा शिक्षक पी. टी. चोपडे, संघ व्यवस्थापक एन. व्ही. नाईक आणि व्ही. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नियमित सराव, योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार करण्यात आले.या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. यू. पाटील, संस्थेचे चेअरमन वाय. एन. मजुकर आणि सचिव प्रसाद मजुकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





