
हत्ती, गवे, रानडुकरांमुळे शेती धोक्यात; शेतकऱ्यांनी वनविभागासमोर मांडल्या समस्या
निलावडे येथे शेतकरी-वनविभाग बैठक; सोलार कुंपण, नुकसानभरपाईसह कालवा काढण्याची मागणी
खानापूर : प्रतिनिधी
निलावडे येथील निलावडे-लिंगदेव मंदिर परिसरात मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता निलावडे पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. खानापूर तालुका आरएफओ तेज साहेब व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जंगली प्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या जीविताला निर्माण झालेला धोका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
निलावडे परिसरासह अशोका-कांजळे, आंबोळी, बांदेकरवाडा, गवळीवाडा, मुगवडे आदी भागांत हत्ती, गवे, रानडुकरे, अस्वल यांसारखे वन्यप्राणी शेतात घुसून ऊस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक झाले असून, वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना शेतीची निगा राखणेही कठीण झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बैठकीत शेतकऱ्यांनी हत्तींकडून झालेल्या पिकांच्या नुकसानीची तसेच पाइपलाइन व नारळाच्या झाडांच्या नुकसानीची योग्य पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. तसेच वन्यप्राण्यांचा शेतात प्रवेश रोखण्यासाठी सोलार कुंपणाची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी अशोका-कांजळे, आंबोळी, बांदेकरवाडा, गवळीवाडा आणि मुगवडे परिसरातून जंगलाच्या हद्दीत मोठा कालवा काढून वन्यप्राण्यांचा शेतजमिनीत प्रवेश रोखावा, अशी सूचना शेतकऱ्यांनी केली. तसेच मुगवडे येथून दारोळी-मलप्रभा नदीपर्यंत मोठा कालवा काढण्याची मागणीही करण्यात आली.शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना राजाराम धुरी, विनायक मुतगेकर, बाळू चोर्लेकर आणि रमेश नाईक यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावर आरएफओ तेज साहेब यांनी वनविभागामार्फत उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सोलार यंत्रणेसाठी आवश्यक मीटर, तार, पोल, बॅटरी आदींचे अंदाजपत्रक तयार करून शेतकऱ्यांना सोलार सबसिडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. ही सबसिडी प्रत्येक शेतकऱ्याला अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत मिळू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.
बैठकीला पीडीओ बळीराम देसाई, माजी अध्यक्ष विनायक मुतगेकर, निलावडे ग्रामपंचायत उपाध्यक्ष राजाराम धुरी, पीकेपीएस अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष, राजू सावंत, ओमानी नाईक, मुकुंद गावडे, रमेश नाईक, साताप्पा कवळेकर, तुकाराम देसाई, ह.भ.प. दिनकर देसाई, ह.भ.प. पुंडलिक उचगावकर, महादेव कवळेकर, तानाजी गावडे, लक्ष्मण राणे, लक्ष्मण धुरी, अनंत बावकर, पांडुरंग देसाई यांच्यासह मुगवडे, गवळीवाडा, आंबोळी, बांदेकरवाडा, मळव आदी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीच्या शेवटी बळीराम देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.


