
गोवा महामार्गावरील ‘होनकल क्रॉस’ जीवघेणा; बायपास न मिळाल्यास आंदोलनाचा इशार
राजू कुंभार: खानापूर
बेळगाव-गोवा महामार्गावरील होनकल जवळील क्रॉसवर सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी बायपास (पूल किंवा पर्यायी मार्ग) नसल्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, आतापर्यंत ९ मोठे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये जीवितहानीसह दोन मुक्या जनावरांचा (म्हशींचा) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर बायपासची सोय करावी, अन्यथा तीव्र उपोषण करण्यात येईल, असा इशारा खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यध्यक्ष अनंत जुंजवाडकर यांनी दिला आहे.
अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीती
बेळगाव-गोवा महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून वेगाने धावणारी वाहने आणि होनकल क्रॉस येथील रहदारी यामुळे सातत्याने धोका निर्माण होत आहे. स्थानिक नागरिक, शेतकरी आणि शाळकरी मुलांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ग्रामस्थांमधून आणि कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अनंत जुंजवाडकर यांचा आक्रमक पवित्रा
या समस्येबाबत बोलताना अनंत जुंजवाडकर म्हणाले की, “होनकल क्रॉसवरील अपघातांमुळे निष्पाप लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. आतापर्यंत ९ अपघात झाले असून दोन म्हशींचाही मृत्यू झाला आहे. प्रशासनाने अजून किती बळी जाण्याची वाट पाहत आहे? प्रशासनाने तात्काळ या क्रॉसवर बायपास किंवा योग्य सुरक्षिततेची उपाययोजना करावी. अन्यथा, ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे उपोषण छेडण्यात येईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचीअसेल.”
Advertise


