AVD ग्रुप चे मालक अजयसिंह देसाई यांच्याकडून हलगा महालक्ष्मी मंदिर पाहणी


AVD ग्रुप चे मालक अजयसिंह देसाई यांच्याकडून हलगा महालक्ष्मी मंदिर पाहणी

भरीव आर्थिक मदतीचे आश्वासन

राजू कुंभार: खानापूर 

कै. विठ्ठलरावजी देसाई (हलशींवाडी) यांचे पुत्र, कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजक आणि ‘एव्हीडी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चे सर्वेसर्वा श्री अजयसिंह विठ्ठलराव देसाई यांनी मंगळवारी हलगा (तालुका खानापूर) येथील निर्माणाधीन श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी मंदिराच्या उर्वरित विकासकामांसाठी भरीव आर्थिक मदत करण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले.

आपल्या कुटुंबीयांसह मंदिर परिसराला भेट दिल्यानंतर श्री अजयसिंह देसाई यांनी बांधकाम कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या कामाची संपूर्ण माहिती घेत मंदिराच्या पुढील टप्प्यांतील नियोजनाबाबत आणि आवश्यक सुविधांबाबत मार्गदर्शन केले. मंदिराची उभारणी अतिशय भव्य आणि आकर्षक पद्धतीने होत असल्याबद्दल त्यांनी बांधकाम कमिटीच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना श्री अजयसिंह देसाई म्हणाले, “श्री महालक्ष्मी मंदिर हे या संपूर्ण परिसरातील भाविकांचे एक प्रमुख श्रद्धास्थान ठरणार आहे. मंदिराचे बांधकाम अत्यंत दर्जेदार आणि नियोजनबद्ध रीतीने वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.” मंदिराच्या बांधकामासाठी भरीव आर्थिक मदत देण्याच्या त्यांच्या आश्वासनामुळे मंदिर कमिटीला मोठा पाठबळ मिळाले असून, विकासकामांना अधिक गती मिळणार आहे.

या पाहणी दौऱ्यावेळी श्री अजयसिंह देसाई यांच्यासोबत त्यांचे बंधू विजयसिंह विठ्ठलराव देसाई, कौस्तुभ विजयसिंह देसाई, नरसिंग दत्तात्रय देसाई, राजू पेडणेकर तसेच मंदिर बांधकाम कमिटीचे अध्यक्ष रणजीत पाटील, रमेश गुरव, पुंडलिक पाटील, नागेश फटाण, संजय ईश्राण, नागेश पाटील, रामचंद्र सुतार, महादेव पाटील, ओमाना केसरेकर, विनोद फटाण आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देसाई कुटुंबीयांनी मंदिराच्या उभारणीसाठी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल आणि दिलेल्या भरीव सहकार्याबद्दल मंदिर कमिटी व हलगा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. देसाई कुटुंबाच्या या मदतीमुळे श्री महालक्ष्मी मंदिराच्या निर्मितीला नवे बळ मिळणार असून, भविष्यात मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास सर्वांनी व्यक्तकेला.

Advertise

 


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!