ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आरपारचा लढा;पद्मनाभ कुलाल


ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आरपारचा लढा;पद्मनाभ कुलाल

12ऑक्टोबरला बंगळूर चलो ची हाक; वेतनश्रेणी’मिळवण्याचा एल्गार!

डॉ. देवीप्रसाद बोल्मा यांच्या नेतृत्वाखालील कायदेशीर लढ्याला राज्यभरातून अभूतपूर्व पाठिंबा

राजू कुंभार: खानापूर

ग्रामपंचायत व्यवस्थेचा कणा म्हणून रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याबाबत एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे! वर्षानुवर्षे केवळ तुटपुंज्या मानधनावर राबवून घेणाऱ्या यंत्रणेला अखेर कर्मचारी वर्ग आव्हान देण्याच्या तयारीत असून, “किमान वेतन नको, सरकारी नियमानुसार ‘वेतनश्रेणी’ (Pay Scale) हाच आमचा हक्क!” असा स्पष्ट आणि आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला असून 12 ऑक्टोबर पासून तुमकुर मधील सिद्धगंगा मठापासून बेंगळूर पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती पद्मनाभ कुलाल यांनी दिली.

दोन पर्यायांपैकी ‘वेतनश्रेणी’चीच निवड!
कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कल्याण संघाचे सरचिटणीस पद्मनाभ आर. कुलाल यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना एका मोठ्या वैचारिक क्रांतीची हाक दिली आहे. सध्या कर्मचाऱ्यांसमोर दोन मार्ग आहेत:
१. किमान वेतन (Minimum Wages): जो महागाईच्या काळात अत्यंत तात्पुरता आणि तोकडा उपाय आहे.
२. सरकारी नियमानुसार वेतनश्रेणी (Pay Scale): ज्यामुळे नोकरीची कायमस्वरूपी सुरक्षा, सेवाज्येष्ठतेचा सन्मान, निवृत्ती वेतन आणि इतर सर्व सरकारी भत्ते मिळण्याची हमी मिळते.
कर्मचाऱ्यांनी आता तात्पुरत्या मानधनाला पूर्णविराम देऊन थेट ‘कायमस्वरूपी वेतनश्रेणी’ मिळवण्याचाच अंतिम मार्ग निवडला आहे.
फुटीरतावाद्यांना दणका आणि कायदेशीर लढ्याचा एल्गार!
काही अंतर्गत गट आणि राजकीय मध्यस्थ आंदोलनाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, अशा घटकांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. डॉ. देवीप्रसाद बोल्मा यांच्या समर्थ आणि अनुभवी नेतृत्वाखाली सध्या हा लढा पूर्णपणे कायदेशीर चौकटीत आणि ताकदीने लढला जात आहे.
एकच संघटना, एकच आवाज!
तालुका आणि जिल्हा स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत सर्व मतभेद बाजूला सारून बिल कलेक्टर, लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्वच्छता कर्मचारी, पंप ऑपरेटर व अटेंडंटसह सर्वांनी एकाच छताखाली एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“आम्ही विखुरलो तर आंदोलन कमकुवत होईल. म्हणूनच, दिशाभूल करणाऱ्यांना बाजूला सारून एकाच महासंघाच्या झेंड्याखाली ‘वेतनश्रेणी हा आमचा हक्क आहे’ हाच नारा संपूर्ण राज्यभरात गुंजणार!” असा ठाम निर्धार या घोषणेने व्यक्त केला आहे.
Advertise


113
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!