AC मॅडम बनल्या गरोदर,DHO सासू तर संचालिका नणंद


AC मॅडम बनल्या गरोदर,DHO सासू तर संचालिका नणंद

थरारक स्टिंग ऑपरेशन; ४ आरोपींना बेड्या

संसार उध्वस्त करणाऱ्यांना दणका: आंतरराज्यीय गर्भपात रॅकेट उद्ध्वस्त!

महालिंगपूर / जत (विशेष बातमी-राजू कुंभार):

चित्रपटालाही शोभेल असा एक अत्यंत थरारक, धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर उघडकीस आला आहे. अनैतिक आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या स्त्री-भ्रूणहत्या व गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी वरिष्ठ महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अभूतपूर्व वेशभूषा केली.

थेट गरोदर महिला, तिची आई (सासू) आणि नणंद बनून अधिकाऱ्यांच्या पथकाने तब्बल १७ तास गनिमी काव्याने स्टिंग ऑपरेशन राबवले आणि या आंतरराज्यीय रॅकेटचे कंबरडे मोडले.

पोलिसांनाही खबर नाही! अधिकाऱ्यांचा थेट धाडसी डाव

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथून गरोदर महिलांना महाराष्ट्राच्या सीमेवर नेऊन बेकायदेशीर लिंगनिदान व गर्भपात केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यावर कोणतीही पोलीस मदत न घेता किंवा सुगावा लागू न देता अधिकाऱ्यांच्या पथकाने स्वतःच मैदान सांभाळण्याचा निर्णय घेतला.

या थरारक कारवाईत अधिकाऱ्यांनी खालीलप्रमाणे रूप धारण केले होते:

* जमखंडीच्या सहाय्यक आयुक्त (AC) श्वेता बिडीकर यांनी स्वतः गरोदर महिलेचा वेश परिधान केला.

* PCPNDT च्या उपसंचालक डॉ. शोभा यांनी गरोदर महिलेच्या नणंदेची भूमिका साकारली.

* जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. सुवर्णा कुलकर्णी या आईच्या (सासूच्या) वेशात सोबत राहिल्या.

१७ तासांचा थरार अन् जाळ्यात अडकले गुन्हेगार!

अधिकाऱ्यांच्या या पथकाने दलालांशी संपर्क साधून तपासणीसाठी गेलो असल्याचा आव आणला. दलालांनी त्यांना महाराष्ट्रातील जत तालुक्यातील जाडर बोबलादी व कजगी परिसरातील एका फार्महाऊसवर नेले. लिंगनिदान चाचणीची तयारी सुरू असतानाच अधिकाऱ्यांच्या पथकाने आपला खरा चेहरा समोर आणून धाड टाकली आणि संपूर्ण रॅकेटचा रंगेहाथ पर्दाफाश केला.

४ जणांना बेड्या; PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल

संजय वाघमोरे. निखिल तेली, दानक्का तेली, कविता गोडेकर या ४ मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे

यापूर्वी महालिंगपूर येथील दलाल कविता बाडनवर हिच्या चौकशीतून या रॅकेटचे धागेडोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले होते. या संपूर्ण टोळीविरोधात PCPNDT कायदा (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act) अन्वये अत्यंत कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी दाखवलेले हे अचाट धैर्य, वेशभूषेची युक्ती आणि १७ तासांचे धाडसी ऑपरेशन यामुळे सर्वसामान्य जनतेतून या ‘लेडी सिंघम’ अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertise


118
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!