चंदगडसह आजरा, गडहिंग्लज परिसरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गौरी-गणपतींचे भावपूर्ण विसर्जन.
चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार
“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा अत्यंत उत्साहपूर्ण, तरीही जड अंतःकरणाने आणि अश्रुनयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. चंदगड शहरासह तालुका आणि लगतच्या विविध भागात दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर गौरी-गणपतींचे अत्यंत शिस्तबद्ध व भावूक पणे विसर्जन पार पडले.

नदीघाटांवर गणेशभक्तांचा जनसागर
आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नदीघाटांवर गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळली होती. आरती करून, मोदकांचा नैवेद्य दाखवून आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन भाविकांनी पुढच्या वर्षासाठी बाप्पाकडे सुख, समृद्धी आणि आरोग्याचे मागणे मागितले.

पर्यावरणपूरक विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नदीपात्रात पीओपीच्या मूर्ती आणि निर्माल्य न विसर्जित करता, ते विसर्जन कुंडात टाकावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला गणेशभक्तांनी उत्तम प्रतिसाद दिला. चंदगड नगरपंचायतीच्या वतीने हेरे रोड तसेच कॉलेज रोडवरील जॅकवेल घाटावर विसर्जन कुंड आणि निर्माल्य संकलनाची विशेष सोय करण्यात आली होती. भाविकांनी निर्माल्य संकलन पात्रात जमा करून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश दिला.

प्रशासन व पोलिसांचे चोख नियोजन
चंदगडसह परिसरातील अडकूर, हेरे, आसगाव, नेसरी, गडहिंग्लज आणि आजरा अशा सर्वच ठिकाणी स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि होमगार्ड यांच्या संयुक्त समन्वयातून विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडला. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने आणि जयघोषाने आसमंत भारावून गेला होता. “पुढच्या वर्षी लवकर या” या आर्त हाकेने आणि भक्तिमय वातावरणात यंदाच्या गौरी-गणपती महोत्सवाची सांगता झाली.

