बाचोळी रस्त्याची चाळण, ग्रामस्थ आंदोलन करणार
खानापूर: राजू कुंभार
खानापूर शहरालगतच्या जांबोटी रस्त्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बाचोळी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि वर आलेली खडी यामुळे रस्ताच शिल्लक राहिला नसल्याचे चित्र आहे. शहरापासून इतक्या जवळ असलेल्या गावाची ही अवस्था असेल, तर दुर्गम भागातील रस्त्यांची काय स्थिती असेल, असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधींच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बाचोळी गाव शहराच्या जवळ असल्याने दररोज विद्यार्थी, महिला आणि कामगार वर्ग या रस्त्यावरून पायपीट करत प्रवास करतात. मात्र, कुंभार ओहोळ पुलापासून ते गावच्या वेशीपर्यंत संपूर्ण रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून दगड-खडी वर आली आहे. यामुळे वाहने मोडकळीस आली असून दररोज अपघात घडत आहेत. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे गावातील दिव्यांगांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.
येत्या काही दिवसांत या रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास गावातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दलित संघटनेचे उपाध्यक्ष इराप्पा मादार यांनी दिला आहे.
यावेळी इराप्पा मादार यांच्यासह किरण मादार, वसंत पाटील, मारुती पाटील, सातेरी मादार, प्रकाश नाईक, पुंडलिक मादार, शिवराम पाटील, हणमंत पाटील, संजय मादार, दत्तू गिरी, मनोज सावंत, नागराज कांबळे, गावडू पाटील यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.



