चंदगड तालुक्यात खड्यातून होणार बाप्पाचे आगमन?


भुलेश्वर-कुर्ला दुर्घटनेनंतरही स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रिस्त; तातडीने खड्डे बुजवण्याची गणेश भक्तांची मागणी.

चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण चंदगड शहर व तालुक्यात लाडक्या गणरायाच्या आगमनाची लगबग आणि जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, तालुक्यातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची झालेली चाळण पाहता यंदा बाप्पाचे आगमन आणि विसर्जन खडतर प्रवासातूनच होणार का, असा संतप्त सवाल गणेशभक्त व गणेशोत्सव मंडळांकडून विचारला जात आहे.

​काही दिवसांपूर्वी मुंबईतील भुलेश्वर-कुर्ला परिसरात मोठ्या गणपतीच्या मूर्तीची ने-आण करताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात घडल्याची धक्कादायक घटना ताजी आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्थाच या अपघातास मुख्य कारणीभूत ठरली होती. अशाच प्रकारची कोणतीही अघटित किंवा अनुचित घटना चंदगड शहर आणि संपूर्ण तालुक्यात गणेशोत्सव काळात घडू नये यासाठी गणेश भक्त व नागरिक यांनी आवाज उठवला आहे.

​सध्या चंदगड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात आगमन मिरवणुका, तसेच विसर्जनाच्या वेळी भव्यदिव्य मूर्ती ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा अन्य वाहनांवरून वाहून नेल्या जातात. खड्ड्यांमुळे मूर्तीला हादरे बसून नुकसान होण्याचा, तसेच विसर्जन मिरवणुकीत वाहने उलटून मोठा अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

​या पार्श्वभूमीवर, भुलेश्वर-कुर्ला दुर्घटनेतून बोध घेऊन स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि संबंधित ग्रामपंचायतींनी तातडीने या समस्येची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. गणेशोत्सवापूर्वी चंदगड शहर व तालुक्यातील सर्व महत्त्वाचे मार्ग, विसर्जन मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सर्व स्थानिक गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास असंतोष पसरण्याची शक्यता आहे.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!