नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते गणेश मंडळांचा गौरव;
गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री. स्वप्नील कुंभार
हसनसो मुश्रीफ फाउंडेशन, गडहिंग्लज आणि गडहिंग्लज नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री गणराया अवॉर्ड २०२५’ तसेच पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महादेव मंदिराच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या गणेश मंडळांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास गडहिंग्लज नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, महेश तूरबटमठ, गुंडू पाटील, संतोष चिकोडे, दीपक कुराडे, , इतर प्रभागाचे सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गुंडू पाटील, अमर मांगले आणि महेश सलवादे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांनी ‘गणराया अवॉर्ड’च्या माध्यमातून गणेश मंडळे आणि तरुण पिढीला एकत्र आणण्याचे काम होत असल्याचे सांगितले. गडहिंग्लज नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे श्रेय त्यांनी गणेश मंडळांतील तरुणाई आणि लाडक्या बहिणींना दिले.
मंत्री हसनसो मुश्रीफ यांचे व्यासपीठावर आगमन होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. तरुण पिढीने शिक्षण, ज्ञान आणि स्वतःच्या प्रगतीला प्राधान्य देत चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. जेन-झी आणि झेन-अल्फा पिढीने आपले शिक्षण आणि उज्ज्वल भवितव्य हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी, असा संदेश त्यांनी दिला.

गणपती बाप्पाच्या महत्त्वाचे उदाहरण देताना मुश्रीफ यांनी गणपती आणि कार्तिकेय यांच्यातील पृथ्वीप्रदक्षिणेच्या शर्यतीची कथा उपस्थितांना सांगितली. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.

‘श्री गणराया अवॉर्ड २०२५’चे विजेते
उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती
प्रथम : श्री महालक्ष्मी मंडळ, कुंभार गल्ली, रिंगरोड
द्वितीय : संयुक्त पेठ तेलवेकर गल्ली
तृतीय : श्री बालगोपाल तरुण मंडळ, मार्केट यार्ड
उत्तेजनार्थ : न्यू शिवशाहू ग्रुप, पाटील गल्ली, काळभैरव रोड
उत्कृष्ट तांत्रिक सजीव देखावा
प्रथम : शिवशक्ती तरुण मंडळ, बुरुड गल्ली
द्वितीय : श्री हाळलक्ष्मी गणेश मंडळ, वडरगे रोड
तृतीय : साई तरुण मंडळ, मांगलेवाडी
उत्तेजनार्थ : न्यू गणेश तरुण मंडळ, बागी कॉम्प्लेक्स
उत्कृष्ट सामाजिक कार्य
प्रथम : युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल
द्वितीय : महेश सलवादे युवा ग्रुप, भीमनगर
तृतीय : नाना ग्रुप, कासार गल्ली
उत्तेजनार्थ : शिवराष्ट्र तरुण मंडळ, बेगर वसाहत, संकेश्वर रोड
उत्कृष्ट पर्यावरणपूरक देखावा
प्रथम : स्वराज्य तालीम मंडळ, घाळी कॉलेजसमोर, भडगाव रोड
द्वितीय : दत्त गणेशोत्सव मंडळ
तृतीय : शिवप्रेमी तरुण मंडळ, रेंदाळे गल्ली
उत्तेजनार्थ : आझाद तरुण मंडळ
पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या माझी वसुंधरा व स्वच्छता सर्वेक्षण अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत—
प्रथम : युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल — ₹२५,००० व आकर्षक चषक
द्वितीय : न्यू आदर्श तरुण मंडळ — ₹१५,००० व आकर्षक चषक
तृतीय : श्री दत्त तरुण मंडळ — ₹१०,००० व आकर्षक चषक
गडहिंग्लज पंचक्रोशीतील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बक्षीस वितरणानंतर विजेत्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री हसनसो मुश्रीफ यांच्यासोबत छायाचित्र घेतले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

