चंदगड पोलिसांचा दणका: डुक्करवाडी (रामपूर) येथे ५५० लिटर रसायन नष्ट, एक अटकेत.
चंदगड प्रतिनिधी : स्वप्नील कुंभार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बनावट आणि बेकायदेशीर दारूनिर्मितीविरोधात चंदगड पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग (गडहिंगलज) यांनी शनिवारी संयुक्त कारवाई करत मोठा दणका दिला आहे. 550 लिटर दारू बनवण्याचे रसायन सह इतर साहित्य आणि संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले.
डुक्करवाडी (रामपूर) परिसरात छापा टाकून गावठी दारूच्या अड्ड्याचा भांडाफोड करण्यात आला असून, या कारवाईतलक्ष्मण आप्पया नाईक (वय ५०, रा. नाईक गल्ली, डुक्करवाडी-रामपूर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यास अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील नाईक गल्ली, डुक्करवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे चंदगड पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे अचानक छापा टाकला.
यात दारू बनवण्याचे रसायन: ५५० लिटर (किंमत ₹१९,२५०/-)
गावठी दारू:10 लिटर (किंमत ₹१,०००/-),इतर साहित्य ₹३,४५०/-,एकूण जप्त मुद्देमाल ₹२३,७००/-
कारवाईदरम्यान दारू बनवण्यासाठी लागणारे तब्बल ५५० लिटर घातक रसायन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अंमलदार हवालदार नाईक (बकल नंबर ३८९) व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. या धडक कारवाईमुळे सीमाभागातील बेकायदेशीर दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

