प्राथ. शिक्षण क्षेत्रात खळबळ!15 हजार शिक्षक रद्द 


प्राथ.शिक्षण क्षेत्रात खळबळ!15 हजार शिक्षक रद्द 

खानापूर : राजू कुंभार

कल्याण कर्नाटकातील प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. सन २०२३ मध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी साठी करण्यात आलेल्या तब्बल १५ हजार प्राथमिक शिक्षकांच्या भरतीची निवड यादी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुरगी खंडपीठाने रद्द केली आहे. तसेच नियमांनुसार नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण कर्नाटक विभागातील शिक्षक भरतीमध्ये संविधानातील कलम ३७१(जे) अंतर्गत स्थानिक उमेदवारांना मिळणारे आरक्षण तसेच एचके (HK) आणि नॉन-एचके (Non-HK) केडर निश्चित करण्याबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रक्रियेमुळे अनेक उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा दावा करत काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणातील अर्जांची सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या कलबुरागी खंडपीठाने संबंधित भरती प्रक्रियेचा आढावा घेतला. न्यायालयाने १ फेब्रुवारी २०२३ रोजी DPR कडून जारी करण्यात आलेले परिपत्रक तसेच ३१ जानेवारी २०२४ रोजीचा KSAT आदेशही रद्द केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नव्याने भरती प्रक्रियेचे निर्देश

न्यायालयाच्या निर्णयामुळे २०२३ मध्ये झालेल्या शिक्षक भरतीतील उमेदवारांचे भवितव्य पुन्हा अनिश्चित झाले आहे. निवड यादी रद्द झाल्याने संबंधित विभागाला आता न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांप्रमाणे नव्याने भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

कल्याण कर्नाटक म्हणजे काय?

कर्नाटक राज्याच्या उत्तर-पूर्व भागातील महत्त्वाचा प्रशासकीय प्रदेश म्हणून कल्याण कर्नाटक ओळखला जातो. या प्रदेशात कलबुरागी, बीदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ, बल्लारी आणि विजयनगर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो.

पूर्वी या प्रदेशाला ‘हैदराबाद-कर्नाटक’ म्हणून ओळखले जात होते. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हा भाग हैदराबाद संस्थानाच्या अखत्यारित होता. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा प्रदेश भारतात विलीन झाला आणि १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर कर्नाटक राज्याचा भाग बनला.

२०१९ मध्ये कर्नाटक सरकारने या प्रदेशाचे नाव बदलून ‘कल्याण कर्नाटक’ असे केले.

कलम ३७१(जे)चे महत्त्व

कल्याण कर्नाटक प्रदेशाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी भारतीय संविधानात कलम ३७१(जे) अंतर्गत विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदींनुसार स्थानिक उमेदवारांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रात विशेष संधी व आरक्षणाची तरतूद आहे.

या प्रदेशाच्या विकासासाठी कल्याण कर्नाटक प्रदेश विकास मंडळ (KKRDB) देखील कार्यरत आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेतील निवड यादी रद्द झाल्यामुळे आता पुढील नव्या भरती प्रक्रियेकडे हजारो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!