कैद्यांचा ‘विवाह’; लग्न अन् हनिमून साठी एकच दिवस!


कैद्यांचा ‘विवाह’; लग्न अन् हनिमून साठी एकच दिवस!

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप… तरीही लग्नासाठी जेलबाहेर!

‘एक दिवसाचा’ पॅरोल; पोलिसांच्या बंदोबस्तात होणार विवाह!

राजू कुंभार: खानापूर 

खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांच्या लग्नाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. लग्नासाठी ९० दिवसांचा पॅरोल मागणाऱ्या या दोघांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने मात्र केवळ एका दिवसाचा तात्पुरता पॅरोल मंजूर केला आहे. त्यामुळे जन्मठेपेच्या कैद्यांचा हा भन्नाट ‘पॅरोल विवाह’; लग्न अन् हनिमून साठी एकच दिवस! याची चर्चा रंगली आहे.

१७ जुलै २०२३ रोजी वडेरहट्टी येथील बनसिद्धेश्वर मंदिर परिसरात शंकर सिद्दप्पा जगमुत्ती (२८) यांचा खून झाला होता. या प्रकरणात त्यांची पत्नी सिद्दव्वा उर्फ प्रियंका (२१) आणि भैरनट्टी येथील श्रीधर अर्जुन तलवार (२१) हे आरोपी होते. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही सश्रम जन्मठेप आणि प्रत्येकी ३ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोघे सध्या बेळगाव मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

दरम्यान, एकमेकांशी विवाह करण्यासाठी दोघांनी ९० दिवसांच्या पॅरोलची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने ९० दिवसांचा पॅरोल नाकारत विवाहासाठी फक्त एका दिवसाची परवानगी दिली आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कडक पोलीस बंदोबस्तात विवाह सोहळा पार पडणार आहे. विवाहानंतर त्याच दिवशी दोन्ही कैद्यांना पुन्हा कारागृहात हजर व्हावे लागणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी एका आठवड्याच्या आत विवाहाची तारीख निश्चित करावी, असेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या या अनोख्या आदेशानंतर आता जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या या दोघांचा विवाह नेमका कोणत्या दिवशी आणि कुठे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेलच्या भिंतीआड सुरू झालेली ही लग्नाची तयारी आता न्यायालयाच्या आदेशामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

Advertise


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!