सहलींसाठी ‘परिवहन’ची बस बंधनकारक


सहलींसाठी ‘परिवहन’ची बस बंधनकारक

 शिक्षण खात्याचे कडक निर्देश

खानापूर: राजू कुंभार

शाळांमधून आयोजित केल्या जाणाऱ्या शैक्षणिक सहलींच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत शिक्षण खात्याने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, सहलीसाठी खाजगी वाहनांऐवजी राज्य परिवहन मंडळाच्या (ST) बसचा वापर करणे सर्व शाळांना बंधनकारक करण्यात आले असून सहलीचे आयोजन करण्यापूर्वी शिक्षण खात्याची पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या वाहनांचे लहान-मोठे अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियमबद्ध व्हावा, यासाठी शिक्षण खात्याने हे पाऊल उचलले आहे.

पूर्वपरवानगी आणि नियमांचे पालन सक्तीचे

दरवर्षी दसऱ्याच्या सुटीनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात शाळांकडून मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक शाळा कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांतील ऐतिहासिक व पर्यटनस्थळांना भेटी देतात.

या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे की, शाळांनी सहलीचे नियोजन करताना शेवटच्या क्षणी घाई न करता आवश्यक कागदपत्रांसह वेळेत परवानगी मिळवणे आवश्यक आहे. विनापरवानगी किंवा नियमांचे उल्लंघन करून सहलीचे आयोजन केल्यास उद्भवणाऱ्या प्रसंगांना संबंधित शाळा व्यवस्थापन थेट जबाबदार असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

नियोजनावर भर देण्याचे आवाहन

सहलीदरम्यान वाहनाची स्थिती, चालकाची पात्रता, प्रवासाचा कालावधी, विद्यार्थ्यांची संख्या, मुक्कामाची व भोजनाची व्यवस्था आणि आरोग्यविषयक सुविधांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण खात्याने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आनंदी व ज्ञानवर्धक अनुभवासोबतच त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertise

 


112
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!