
खानापूरजवळ १५ हजार रुपयांच्या गांजासह एकाला अटक
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
खानापूर: राजू कुंभार
खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) दुपारी १ ते ३ च्या सुमारास हिरेहट्टिहोळी गावच्या हद्दीत करण्यात आली.
नौशाद महेबूब सनदी (वय ४२, रा. हिरेहट्टिहोळी, ता. खानापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नौशाद सनदी याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे सुमारे १५,००० रुपये किमतीचा ७०० ग्रॅम गांजा स्वतःजवळ बाळगला होता. रविवारी दुपारी गाडीकोप्प क्रॉसजवळ, पारिजात-एम.के. हुबळी रस्त्याला लागून असलेल्या शेतातील कच्च्या रस्त्यावर तो आपल्या मोटारसायकलवर थांबून लोकांना गांजा विकत होता.
याबाबतची गुप्त बातमी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७०० ग्रॅम गांजा, मोटारसायकल आणि गांजा विक्रीतून मिळालेली ५४० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Advertise



